Politics News : अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ?? प्रदेशाध्यक्षांकडून मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे (Ajit Pawar) ज्याप्रकारे महाराष्ट्राचे नुकसान झालं आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार आणि विलीनीकरण होणार हे जवळपास नक्की झालं असतानाच अचानक अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राष्ट्रवादी कोसळली आहे. आता पक्षाची पुढची दिशा काय असणार? दोन्ही गट एकत्र येणार का? आले तर एकसंघ राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार या चर्चाना उधाण आलं आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

काय म्हणाले शशिकांत शिंदे?

महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असं अजित पवार म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल होईल,” अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला एक होताना दिसतील असं चित्र आहे. महत्वाची बाब म्हणजे दिग्गज नेते जयंत पाटील यांनीही काल अशाच प्रकारचे विधान केलं होते. अजित पवार यांचीच इच्छा होती कि दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्या, त्यासंदर्भात त्यांची शरद पवार साहेबांसोबत बैठकही झाली होती अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली होती. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी बघायला मिळतील.

झिरवाळ म्हणतात सुनेत्रा वहिनींना मंत्रीमंडळात घ्या

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार याना मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी केली आहे. सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे. सगळे बारामतीकर म्हणतीलच म्हणतील पण महाराष्ट्रातून सगळेजण म्हणतात की वहिनींना आता सत्तेत आणलं पाहिजे. असे मत नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केलं. तसेच आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या आहेत. तुतारी आणि घड्याळ आता एकच आहे. आपल्याला वेगळं होऊन चालणार नाही, एकत्रच राहायला हवं, तीच आपली गरज आहे असं सांगायलाही नरहरी झिरवाळ हे विसरले नाहीत.

Leave a Reply

Discover more from Hello Maharashtra

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading