हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Solapur ZP Election Result 2026 । सोलापुर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मोहिते पाटील घराणे (Mohite Patil) आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) याना मोठा धक्का बसला आहे. भाजपने दहिगाव आणि गुरसाळे या महत्त्वाच्या गटांमध्ये विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत दहिगाव गटातून राम सातपुते (Ram Satpute) यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचा दणदणीत पराभव केला. संस्कृती सातपुते यांनी जीवन जानकर यांचा ११०० मतांनी पराभवाचे पाणी पाजलं . संस्कृती सातपुते (Sanskruti Satpute) यांच्या विजयानंतर माळशिरसमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरु केला. उत्तम जानकर यांनी यापूर्वी पार पडललेया विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा पराभव केला होता, त्या पराभवाचा वचपा राम सातपुते यांनी आत्ता काढला.
प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते आपल्या चार महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन गावोगावी फिरत होत्या. एका आईचा हा संघर्ष पाहून महिला वर्गाची मोठी सहानुभूती त्यांना मिळाली, जी विजयासाठी निर्णायक ठरली, असं बोललं जात आहे. विरोधकांकडून, सोशल मीडियातून सातपुते यांच्यावर टीका करण्यात आली होती, मात्र तुमची दुश्मनी माझ्याशी आहे. मग माझ्या चार महिन्याच्या लहान बाळावर टीका करायचे काय कारण? असा सवाल राम सातपुते यांनी विरोधकांना केला. या प्रचारामुळे त्याठिकाणची निवडणूक हि भावनिक बनली, ज्याचा फायदा हा राम सातपुते आणि संस्कृती सातपुते याना झाला.
दुसरीकडे, माळशिरस तालुक्यातील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या ठिकाणी भाजपचे बाळासाहेब शेळके विजयी झाले आहे. मोहिते पाटील यांच्या गडाला या पराभवामुळं मोठा सुरुंग लागला आहे. मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेला हा विजय आगामी राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मोहिते-पाटील यांच्या घरातील आणि विश्वासातील उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे या भागातील त्यांच्या एकहाती सत्तेला भाजपने मोठे खिंडार पाडले असल्याचे बोलले जात आहे.
खरं तर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांची खऱ्या अर्थाने या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. विद्यमान खासदार आणि आमदार यांनी एकत्र येत भाजपला आव्हान दिलं होतं. मात्र भाजपने हे आव्हान स्वीकारत या दोघांचाही पराभव केला. यापूर्वी मोहिते-पाटील आणि जानकर यांची युती जिल्ह्याच्या राजकारणात वरचढ ठरली होती, मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने अतिशय सूक्ष्म नियोजन करत मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांचा पराभव करण्यात यश मिळवलं.