हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात निवणुकीच्या निकालानंतर दरी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. निमित्त ठरलं कल्याण डोंबिवली येथील मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला दिलेला पाठिंबा. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रशी गद्दारी करणाऱ्या लोकांना मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पाठिंबा द्यायला नको होता असं संजय राऊत यांनी म्हंटल होतं. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंबाबत सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मिश्रा नावाचा व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या नंबर 1 आणि नंबर 2 च्या व्यक्तीला भेटला, आमच्या फारूक अहमद यांना याबाबत माहिती कळाली, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांच्या युतीमध्ये मोठी दरार पडली आहे. शादी एकसे प्यार दुसरे से, असं त्यांचं सगळं चाललं आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती तुटणार का? या चर्चांना जोर आला आहे.
मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी, आणि महाराष्ट्र धर्मासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महानगर पालिका निवडणुकीत आघाडी केली. दोन्ही ठाकरे बंधू तब्ब्ल २० वर्षांनी एकत्र आले. ठाकरे ब्रँड त्यांनी सेट केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याचे मराठी माणसाला सुद्धा बळ मिळालं, आनंद झाला. मात्र निवडणुकीत ठाकरेंना अपेक्षित असं यश मिळालं नाही. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ६५ जागा जिंकता आल्या असल्या तरी दुसरीकडे मनसेची मात्र अक्षरशः वाताहत झाली. मनसेला अवघे ६ नगरसेवक निवडून आणता आले. मनसेची मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिफ्ट झाली. परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मते मनसेकडे म्हणावी तशी वळाली नाहीत असं बोललं जात आहे. त्याचा फटका मनसेला बसला.