Shambhuraj Desai : पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी! शर्टावर रक्त, हाताला मार, जिल्हा परिषदेत हाय वोल्टेज राडा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषद (Satara ZP Election) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी हाय वोल्टेज राडा बघायला मिळाला. भाजपने ऐनवेळी गेम पलटवत जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली असली तरी या निवडीला हिसंक वळण लागलं. जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि याच गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai Injured) यांच्या डाव्या हाताला मार लागला. शंभूराज देसाई याना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीकडे बहुमत मिळ्वण्याएवढं आणि सत्ता स्थापन करण्याएवढं स्पष्ट बहुमत होते. मात्र दुसरीकडे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून सुरु होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आला होता. याच दरम्यान, शंभूराज देसाई हे आपल्या सदस्यांना सभागृहात घेऊन जाताना भाजपा आणि शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली. या गर्दीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली आणि त्यांच्या हातातून रक्त येऊ लागलं. या सगळ्या प्रकारावर शिवसेना शिंदे गटात संताप व्यक्त केला जात आहे.
शंभूराज देसाई यांनीही या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. भाजपने ज्यांना पळवलं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार, मंत्र्यांना धक्काबुक्की होत असेल तर याचा गंभीर परिणाम येत्या काळात भोगावा लागणार, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असून मलाच १० पोलीस ओढत होते. मकरंद आबा तिथे माझ्या मदतीला आले. आबाना ४- ६ पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस ओढत असतील आणि यामध्ये माझ्या हाताला रक्त आलं. मी रुमाल बांधला त्या हाताला आणि नंतर पट्टी या केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले. सातारा पोलिसांनी केलेलं अत्यंत निंदनीय कृत्य आहे. लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणाने उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत. आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. असं शंभूराज देसाई म्हणाले.
दरम्यान, 65 सदस्यांच्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सर्वाधिक 27 उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० तर शिवसेनेकडे १५ सदस्यांचे संख्याबळ होते. त्यातच स्वाभिमानीच्या एका सदस्यानेही राष्ट्रवादीसोबतच गटनोंदणी केल्याने एकूण संख्याबळ हे ३६ झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने निवडणुकीपुर्वीच आघाडी केल्याने राष्ट्रवादी- शिवसेना यांच्या युतीची सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होणार असे अंदाज राजकीय विश्लेषक मांडत होते. मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या दिवशी भाजपने मोठा गेम फिरवला आणि सत्ता काबीज केली.










