Adhiraj Patil Undalkar

Adhiraj Patil Undalkar : उदयसिंह उंडाळकर यांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला!! कराडात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र अधिराज पाटील उंडाळकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. काल रात्री वडिलांच्या प्रचार दौऱ्यानंतर घरी येताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात अधिराज पाटील (Adhiraj Patil Undalkar) यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे जोरदार वार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. याठिकाणी उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस एकत्रितपणे भाजपविरोधात उभी ठाकली आहे. स्वतः उदयसिंह उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गणातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वडिलांच्या प्रचारात अधिराज पाटील हे सुद्धा आघाडीवर असून प्रत्येक गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, चर्चा करत आहेत.

याच दरम्यान, शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आटोपून आदिराज पाटील हे दुचाकीवरून घरी परतत असताना उंडाळे-शेवाळेवाडी रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्यात आदिराज पाटील यांच्या पायाला जखमा झाल्या. यावेळी दुचाकीवर धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते.

हल्ल्यानंतर दोघांनी प्रसंगावधान राखत तातडीने लोकवस्तीकडे धाव घेतली. त्यानंतर आदिराज पाटील यांना उपचारासाठी उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading