NCP New President : दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? समोर आली महत्वाची अपडेट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन NCP New President । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे जाणार यावर मागील काही दिवसापासून चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवार यांची अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदी निवड झाली असली तरी सर्वात महत्वाचं पद असलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल आणि नंतर पार्थ पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं होते, मात्र आता सुनेत्रा पवार यांच्याच गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडेल हे निश्चित झालं आहे.
अजित दादांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा चेहरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचं अजित पवार यांच्या राजकीय वारसदार असणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचीच निवड करण्यासाठी लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीसाठी पक्षातील बडे नेते, पदाधिकारी उपस्थित असतील. याचवेळी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या पाऊलावर पाऊल टाकत थेट कराडला जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं होते. त्यानंतर काल मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. .आज पुण्याच्या पालकमंत्री म्हणून त्या आपली पहिली अधिकृत DPDC बैठक घेणार आहेत. या बैठकीत जिल्ह्याच्या आगामी वर्षाच्या विकासकामांच्या निधीवर चर्चा होणार असून सुनेत्रा पवार प्रशासनाला नेमके काय निर्देश देतात हे पाहायला हवं.
सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी बारामतीमध्ये संघटनात्मक पातळीवर काम केले आहे. मात्र, आता थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अशा तिन्ही मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यासमोर असणार आहेत. त्यामुळे त्या सक्रिय राजकारणात कशा पद्धतीने काम करतात? त्यांना पक्षातील इतर नेत्यांची साथ मिळतेय का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार काय निर्णय घेतील? या सर्व प्रश्नांच्या उत्तराकडे महाराष्ट्राचे लक्ष्य आहे.









