मुंबईत मनसेची भाजपला साथ? राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसेने (MNS) अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा दिला आणि सत्तेत बसण्याचा निर्णय घेतला. आता अशाच प्रकारचा निर्णय मुंबईत सुद्धा मनसे घेणार का? अशा प्रकारच्या चर्चा मागील काही दिवसापासून सुरु होत्या. याबाबत आता खुद्द राज ठाकरेंनीच (Raj Thackeray) आपली भूमिका जाहीर करत आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट केलं.
आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बाहेर पडताच राज ठाकरे यांना भाजपसोबत तुम्ही जाणार का असा प्रश्न करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरेंनी भाजपासोबत जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांचे खंडन केले. आम्ही मुंबईत भाजपसोबत जाणार नाही, मी सांगतोय ना, नाही म्हणजे नाही. असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खरं तर मुंबईत भाजप आणि शिंदे गटाला ११८ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे महायुतीने यापूर्वीच बहूमताचा टप्पा पार केला आहे. परंतु तरीही जे कल्याण डोंबिवलीत झालं ते मुंबईत होणार का? यावर राजकीय चर्चा सुरु होत्या. अखेर राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
मनसेचे प्रमुख नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही भाजपसोबत मनसे जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. पाठिंबा देण्याबाबतची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही. अशा प्रकारचे कुठलेही समर्थन देण्याचा विषय नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रथमच राजकीयदृष्ट्या एकत्र आले होते. मुंबई आणि मराठी माणसाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं ठाकरे बंधूंकडून सातत्याने सांगण्यात आले. ठाकरेंच्या एकजुटीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मोठी रंगत आली. मात्र चुरशीच्या लढतीत ठाकरे बंधूंचा पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा जिंकता आल्या तर राज ठाकरेंची मनसे अवघ्या ६ जागांवर विजयी झाली.









