Sunetra Pawar In Karad

Sunetra Pawar In Karad : उपमुख्यमंत्री होताच सुनेत्रा पवार कराडमध्ये दाखल; यशवंतरावांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sunetra Pawar In Karad । उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार यांनी थेट कराड गाठत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यापूर्वी अजित पवार दरवर्षी येथे अभिवादन करण्यासाठी येत असत, तोच वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेत असल्याचे मानले जात आहे. अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत सुनेत्रा पवार आज कराडमध्ये दाखल झाल्या.

सकाळी 10 वाजता सुनेत्रा पवार यांचे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमवर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री मकरंद पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, रुपालीताई चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर, त्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथे अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी रवाना झाल्या. अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला तेव्हा सुरक्षारक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानात होते. विमान कोसळल्यानंतर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता.

अजित पवार आणि कराडमधील यशवंतराव चव्हाण यांचे प्रीतिसंगम यांचं एक अनोखं नातं होते. अजित पवार यांनी अनेकदा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. आपल्या भाषणांमधून ते अनेकदा आपले राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालत असल्याचे सांगायचे. त्यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारही हाच वसा पुढे चालवताना दिसत आहेत. हा दौरा केवळ श्रद्धांजलीपुरता मर्यादित न राहता, अजित पवारांच्या वैचारिक परंपरेचा पुढचा अध्याय असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading